Saturday, February 19, 2011

आठवणींच्या कविता २

अशाच दुसऱ्या संध्याकाळी

अशाच एका संध्याकाळी: सुंदर खेळ, जमतो मेळ, सारं जग आपलं असतं;
अशाच दुसऱ्या संध्याकाळी: काही फसतं, बहुतेक सरतं, थोडं उरतं...

अशाच दुसऱ्या संध्याकाळी... कुणीही साद न घालता,
अपोआप मनातला आठवणींचा पडदा उघडतो;
मनामधला भाव नकळत डोळ्यांमधून निसटतो...

आठवतात पंधरा ओडीशन्स, कोणी आत, बाहेर कोणी;
नाटकासाठी तरीही झटतो, डोळ्यांमधलं लपवत पाणी...
आठवतं झापलेलं - मोठा आवाज, टायमिंग, बेअरिंग, enegy;
आणि रोज रोज खाऊन आलेली, पाव-भाजीची alergy ...

एक संपतो, दुसरा विचार म्हणतो 'मी आत येऊ का ?'
अरे 'बे विंडो' चांगली होती, पण ठेवला मल्टी पर्पज झोका...
प्रसंग आहे परंतु बाका...
मनातले विचार 'टकबक टकबक',
पटत नाहीयेत, काढून टाका...
वाटतं उगाच कुठूनतरी, character ची एन्ट्री होईल;
धाडधाड त्याच्यापाशी मनामधलं बोलता येईल...

पण 'भरत'च्या कट्ट्या वरची निःशब्द शांतता,
जणू कुठूनतरी जांभळा साप आलाय;
हळुवार, अवखळ वाऱ्यानी, मनातल्या प्राजक्ताचा सडा
कुठल्या कुठे उडून गेलाय...
वाटतं दूर निघून जावं, लागणार नाही इथे निभाव;
फक्त इथे असण्याचाही, मनावरती पडतो प्रभाव...

स्टार, बाण, फुल्या, कंस -
मनामध्ये वेगळीच स्क्रिप्ट सुरु होते;
अन अशाच दुसऱ्या संध्याकाळी सुद्धा,
उन्हाची सुंदरशी तिरीप पडते...!

Thursday, February 17, 2011

आठवणींच्या कविता १

एक ओंगळ कविता

(पहिल्या 'पुरुषोत्तम'च्या रिझल्ट नंतर लिहिलेली कविता...)

कितीही लक्ष दिलं, तरी डोक्यात काहीही जात नव्हतं;
लिहायचं ठरवलं, तर पेनच उमटत नव्हतं...
लायब्ररी गच्च भरली होती, कॅंटीनचे कट्टे होते मोकळे;
मेक फ्लोअर, ऑडी... सुन्न सुन्न होते सगळे...
कुठेतरी मनामध्ये सबमिशनचा लोड होता;
कॅंटीनचा रोजचा चहा, काल मात्र आगोड होता...
काल घरी जाताना एकही मुलगी दिसली नाही;
पेपर मधली मॉडेलसुद्धा, काल अजिबात हसली नाही...

घरी आल्यावर आठवडाभराच्या आठवल्या टेस्ट;
म्हटलं आता अभ्यास, टाईम नाही करायचा वेस्ट ...
पण परीक्षेसाठी वाचू म्हटलं, तर पोर्शनच माहित नाही;
जरनल लिहायचं, तर रायटप सापडत नाही...
शेवटी ठरवलं, एवढा प्रयोग झालाच पाहिजे कम्प्लीट;
निर्धारानी बसलो, पण तेवढ्यात गेले लाईट...

कॅण्डलच्या प्रकाशात मग उगाचच बसलो होतो,
स्वतःशीच चर्चा करत...
Black-out पूर्ण झाला की मगच उठायचं,
उगाचच आठवलं परत परत...
मग ठरवलं, झकास पैकी म्हणू गाणी,
कसं कोण जाणे, पण डोळ्यात दाटलं होतं पाणी...

प्रत्येक दिवस, प्रत्येक स्ट्रेच, प्रत्येक क्षण आठवला,
स्ट्रेचच्या आधी केलेला प्रत्येक पण आठवला...
Energy, मोठा आवाज, टायमिंग, बेअरिंग;
एन्ट्री, एक्झिट प्रत्येकवेळी, फक्त फक्त दुसरी विंग...
घाबरायचं नाही, बिनधास्त, प्रत्येकवेळी घ्यायचा लाईट
फोकस मुळीच सोडायचा नाही, ग्रीन रूम मध्ये बसायचं क्वाईट...
आठवल्या चुकलेल्या टाळ्या, आठवला दोन दिवसात बसवलेला चौथा सीन;
आठवलं म्हणलेलं, 'पाहिलंस... मी तुमचा बाप', कडक तिसरा सीन...
आठवले एकत्र खाल्लेले डबे, आठवलं ज्ञानेश्वर, जोगराम, सुहाग;
आणि उगाचच केलेलं चर्वण, कॅंटीनचा क्रीमरोल टपरीपेक्षा का महाग ?


मघाशी रायटप शोधताना वर आलेला 'गोष्टीचा' कागद,
उगाचच हातात आला;
मग मात्र आसवांवरचा संयम, पूर्ण सुटला...
कळलं आता मेणबत्तीचा प्रकाशसुद्धा धोका देईल,
भिंतीवरचं घड्याळ उगाच साडे-आकराचा ठोका देईल!

झटकन मान फिरवली, डोळे गच्च मिटून घेतले;
गालावर ओघळलेले दोन थेंब, तेवढ्यात बहुतेक चमकून गेले...
'काय करतोयस ?' आई म्हटली, म्हटलं 'जरा झोपतो आत',
विचार थांबतील दोन क्षण, मी उठण्याची वाट पहात...
कॉटवर झोपताना गुडघा दणकन आपटला,
म्हटलं 'सैतान त्रिफोन तुझ्यामुळेच !'
मनातले विचार, खरंच... खुळेच...

लाईट आले, चेहेरा झाकत म्हणालो 'शीट !'
मुझिक, लाईट्स, सेट, डायरेक्शन.. सगळंच होतं की परफेक्ट फिट...
तेवढ्यात आई म्हणाली, 'जरा घे खाऊन',
भरले डोळे, ओले गाल, म्हटलं 'येतो हात धुवून'...
जेवायला बसलो, तर ताटात होतं पिठलं;
आईला कसं सांगणार, जेवणावरचं लक्ष दुपारीच उडलं...

पहिला घास घेतानाच खणाणला फोन,
'कसं झालं नाटक?', आजीचा टिपिकल टोन...

म्हटलं आजी चांगलं झालं
पण आमचं रिकामं खातं,
एक बक्षीस आहे बरं का
बाकी बहुतेक परीक्षकांशी जुळलं नाही नातं...

आजी म्हणाली 'अरे वेड्या, प्रयत्न करत रहा...
अरे आज नाही तर उद्या मिळेल,
काहीतरी नवीन, चांगलं केल्याचं समाधान तर पहा'
मी म्हटलं 'खरय, प्रयत्न करणं आमचं काम आहे,
आता फक्त अडीच महिने आराम आहे !'

फोन ठेवला, कळलं, च्यायला आपण खरंच सांगितलं...
"माणसाचा स्वभाव सूर्यप्रकाशासारखाच, न बदलणारा"
हे त्या 'माणसांना' का नाही कळलं ??

Wednesday, February 2, 2011

नकार कि...

मनात माझ्या स्पंदनांचा ललकार होता
नकार कि, तुझा सये तो... होकार होता ?

असायचो कितीकदा त्या, गर्दीतही मी एकटा
काल एकांतातही का, सखे तुझा, आधार होता ?

मनातली प्रत्येक माझ्या, व्यथा मला, तुझ्यात दिसली,
काल का इतुका तुझा, चेहेरा सखे, निर्विकार होता ?

भासली आसवेही माझी, खळीत तुझिया, मोत्यांपरी
काल का, वेड्या कळीला, इवल्या दवाचा भार होता ?

हसणे तुझे कि, स्फुरायचा तो, खळाळता झरा इथे
काल स्मितहास्याताही का, सळाळता ध्रोंकार होता ?

ढळायचा अश्रू तुझा अन, चूक माझी उमगायचो मी
काल का मग एवढा, हुंदका हळुवार होता ?

अनेकदा सुरांत माझ्या, वाहिलेस तू स्वतःला
काल का भैरवीत माझ्या, श्वास तुझा, गंधार होता ?

असायचो सम्राट मी अन, शब्द तुजला, सुनवायचो मी
गुलाम झालो काल पुरता, कविते तुझा दरबार होता !

तुझ्यामुळे अस्तित्व माझे, नाही तुला, पुसायचे मी
कळवायचा कवीनेच त्याचा, कविते तुला, होकार होता !