Saturday, December 15, 2012

भरले

भरले नभ भरले, भरले नभ भरले
अन आसमंत हे क्षणात कोठे विरले ?
भरले नभ भरले, भरले नभ भरले ...

त्या कृष्ण ढगांनी केली काळी माया
अन सोडून गेल्या पायांमधल्या छाया,
पांघरून वरुनि काळा कातर शेला
तो तेजस्वीही अज्ञातात बुडाला,
अन दूर कुठे ते क्षितिजही आज हरवले ?

भरले नभ भरले, भरले नभ भरले ... 

या सागरास हा एकच इथे किनारा
ही क्षुब्ध वाळु अन स्तब्ध स्तब्ध हा वारा,
तो शोधे जेव्हा एक वेगळी वाट
तेव्हाच उमटते उंच एकटी लाट,
का उठले पाऊल सावकाश विरघळले ?

भरले नभ भरले, भरले नभ भरले ...
 
आभाळ भासते अता वेडे शून्य
तरीही त्यापुढती सारे क्षूद्र, नगण्य,
ते स्वतःच देई स्वतःस आता भोज्या
अन वाढत जाई अथांग त्याची त्रिज्या,
भागिले मनाला त्याने, अगणित उरले ...
 
भरले मन भरले, भरले मन भरले
भरले मन भरले, भरले मन भरले ...
हे क्षणात कुठुनी थेंब दोन ओघळले ?
भरले नभ भरले, भरले नभ भरले ...
भरले मन भरले, भरले मन भरले ...
भरले नभ भरले, भरले नभ भरले ... 

Friday, October 5, 2012

पसारा

शोधतोय एवढं मी, सारखं सारखं ...
पण ही  कविता मात्र, काही केल्या सापडत नाहीये अजिबात ...
मनामध्ये नुसता विचारांचा पसारा झालाय ... ...
नुसता पसारा...

तशा एरवी, पसाऱ्यात मला वस्तू सापडतात पट्कन ...
पण गेले काही दिवस, काहीतरी जाम बिनसलंय ...
ते कसंय ना,
जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अगदी,
अगदी मनापासून हवी असते ...
तेव्हा त्या गोष्टीला ते कळतं बहुतेक, अपोआप !
मग ती नेमकी काही केल्या सापडत नाही
कितीही शोधा, नुसता पसारा होतो मग ...
नुसता पसारा ...

घरी होतो तेव्हा एक बरं होतं  ...
अशा वेळी मी उगाच जुन्या वह्या उचकायचो
कुठल्यातरी वहीच्या शेवटच्या पानावर
उगाच कुठलीशी अनामिक कविता लिहिलेली सापडायची
(शाळा कॉलेजात तासांना फारस लक्ष द्यायचो नाही,
हे किती बरं होतं !)
मग शेवटच्या पानावर, काही ओळी खरडलेली
ती अभ्यासाची वही,
मला उगाच माझी कवितांची वही असल्यागत वाटायचं
मी अजून एखादी तशी वही शोधू लागायचो
माझ्या कवितांच्या अनेक वह्या असल्यासारखं ... उगाच ...
"अरे का पसारा करतोयस स्वान्द्या ?"
मग आई विचारणार ...
छे! मनात नुसता विचारांचा पसारा झालाय ...
नुसता पसारा ...

करायच्या उरलेल्या assignments , तपासायचे राहिलेले reports ,
पुढच्या आठवड्यातल्या परीक्षा ...
हे अशा वेळी असलं काहीतरी टपकंत मनात
Facebook उघडून बसलं, की का नाही रे टपकंत तुम्ही ?
च ... मी पसाऱ्याचा अजून पसारा घालतोय ...

मग ... मग आठवणी शोधू का ?
आठवणींच्या फार सुंदर कविता बनतात ...
नाही ... नाही नको !
मग मीच हरवून जाईन त्यांच्यात पूर्णपणे  ...
काहीशे मैल दूर असणं वेगळं
आणि सात समुद्र दूर असणं फार वेगळं ...
उगाच मग पापण्या ते समुद्र ओलांडू पाहतात ...
आणि मग समोरचं सारं गढूळतं ... ... ...
नको ! आठवणी नकोच !

अरे, नको म्हटलं न तुम्हाला,
मग तरी उगाच का गढूळल्यागत वाटू लागलाय ...
आत्ता ... हो, नेमकी आत्ता, ही कविता सापडायला हवी,
आणि म्हणूनच मग ती सापडत नाहीये कदाचित ... 
दिसतोय  तो नुसता पसारा ...

या अशा, आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टींनी,
response द्यायला हवा आपण हाक मारल्यावर ...!
पण मग कविता 'ओ' देईल,
अशी खोल हाळी द्यायला हवी ...
आणि आतून हाक मारायला,
मन रितं असायला हवं ...
म्हणजे मग हळुवार ते कवितेनी भरून जाईल ...!
किंवा मग ते आधीच भावनांनी काठोकाठ भरलेलं हवं ...
म्हणजे मग अलगद कविता वर तरंगत येईल ...!
पण .... पण मनात साला नुसता विचारांचा पसारा झालाय ...
नुसता पसारा ... ... ...


Tuesday, March 6, 2012

तरंग

 धगधगत्या दुपारी, वाऱ्याच्या झुळुकेची वाट बघत
एका निश्चल तळ्याच्या काठावर बसलो होतो. . .
पाण्यामध्ये दगड टाकला. . .   . . .   . . .  तरंग उठले. . .

कसल्याशा आवाजानं त्या अजस्त्र शांततेला, क्षणभर नाकारलं;
पाण्यातलं आकाशाचं विस्तीर्ण चित्र, असंख्य तुकड्यात विखुरलं 
        पिंपळावरचा पारवा फडफडत उडत गेला, झाड सळसळलं;
        पिकलं पान गळलं एक, झाड वेडं हळहळलं
पिकलं पान हळुवार पाण्यावरती उतरलं;
उमटलेल्या त्या तरंगांवर, पान थोडं हेलकावलं
                                       . . .   . . .   . . .  तरंग विरले. . .

दोन क्षण चार गोष्टी, सारं पुन्हा स्तब्ध स्तब्ध
अचल वारा  निश्चल पाणी, सारं थोडं क्षुब्ध क्षुब्ध

पुन्हा एकदा पाण्यामध्ये दगड टाकला. . .   . . .   . . . तरंग उठले !
उमटलेल्या त्या तरंगांवर, पान पुन्हा हेलकावलं. . .
        आता ते अलगद परत येईल, काठावरच्या झाडाला वेडी आस;
        ते नक्की परत येईल, माझ्या खुळ्या  मनाला पक्का विश्वास

तरंग !!! पाण्याची वरखाली होणारी हालचाल
                                                गतिमान होण्याचा फक्त आभास. . . 
    

Friday, February 24, 2012

क्षितीज

ज्याचं त्याचं, प्रत्येकाचं, स्वतःचं एक क्षितीज असतं...
जो जसं बघतो ना, त्याला ते तसं दिसतं...

तुझं माझं क्षितीज मात्र एक आहे, कधी कधी वाटतं...
जेव्हा, तुझ्या मनात माझ्या मनात, एकंच  मळभ दाटतं...

पण मग, मुसळधार पावसामध्ये, वेगळं होतं आपलं क्षितीज...
माझी जोरात गडगडते, तुझी फक्त चकाकते वीज... 

अन मग संध्याकाळी क्षितिजावर माझ्या, उमटतात असंख्य रंग...
पण तुझं क्षितीज मात्र असतं, आभाळाच्या निळाईतच दंग...

रात्री माझ्या क्षितिजावरती, हलकंच  धुकं पसरू लागतं...
अन तुझं क्षितीज मात्र कसं, चांदण्यांनी बहरून जातं...
 
तुझी गुलाबी सकाळ... माझी रंगीत संध्याकाळ...
तुझं निळशार आकाश... माझा सोनेरी संधिप्रकाश...

तुझं माझं, ज्याचं त्याचं, क्षितीज वेगळं वेगळं असतं...
जो जसे डोळे मिटतो, त्याला ते तसं दिसतं...



Thursday, February 16, 2012

आठवणींच्या कविता ४

(पुढच्या काही महिन्यांमध्ये, बंगलोर सारख्या शहरात मला एक मस्त, मराठी नाटक करायला मिळणार आहे, हे मला 'ती' पोस्ट लिहिताना माहित नव्हतं. म्हणून कदाचित तिला नाटकावरची शेवटची कविता म्हटलं. ही कविता तशी फारशी नाटकावरची नाहीये म्हणा... ही कविता आहे त्या नाटकासाठी भेटलेल्या काही 'वेड्या' माणसांवरची... )


कागद

शेवटी न राहून, कपाटातून तो कागद बाहेर काढला ;
नीट घडी घालून ठेवलेला, तरीही थोडासा सुरकुतलेला...
कितीही भुर्रकन गेला असला,
तरी तीन-साडेतीन महिन्यांचा काळ गेलाय...
हे स्पष्टपणे दाखवणारा...
पडलेल्या प्रत्येक घडीमध्ये, बरंच काही जपणारा...

या कागदावरचं सारं, तोंडपाठ होतं तेव्हा;
अगागां गांग काकाक ... ... ...
मग आता आठवत का नाहीये ?
अपोआप विसरलोय... की तेव्हाच्या असंख्य आठवणींमध्ये,
हरवून गेलंय कुठेतरी...
सगळं... सगळं कसं वेगळंच होतं नाही तेव्हा...

भरपूर ट्राफिक आणि प्रचंड धुळीमध्ये,
किती निवांतपणे गाडी चालवायचो...
रात्री दीड-दोनला सुद्धा, केवढा फ्रेश असायचो...
ऑफिसमधलं काम संपवावं लागायचं नाही, ते संपायचं...
दिवसाच्या फक्त चोवीस तासात, केवढं काही केलं जायचं...
पण मग आता? ... ... ... तशा, काही गोष्टी बदलल्या आहेत म्हणा...

परवा मेडिकलच्या दुकानात गेलो, तर पाहिलं लक्ष 'इनो'च्या packet वर गेलं;
अन एक साधं envelop चिकटवायला, मी मोठ्ठ फेविकोल विकत घेतलं...
                मधे एकदा कोपऱ्यावरच्या बेकरी मध्ये चहा पिताना,
                उगाचच वाटलं...
                यानी कधी कुठल्या म्याडमला चहा दिला असेल का?
                        का कोण जाणे, तेव्हापासून मी त्याच्याकडे बघून हसतो...
                        त्याचा चहाचे डाग पडलेला, जुना थर्मास;
                        मला खरडून चमकवल्यासारखा भासतो...
हल्ली, 'हो' आणि 'का?' हे शब्द मी वेगळेच म्हणतो;
'पाणी आणून देऊ का?' उगाच अधेमधे मित्रांना विचारतो...
पुन्हा एकदा मला, रात्री चहा प्यायची सवय जडलीये;
आणि माझ्या exclamatory  reactions  मध्ये,
'ईSS' ची भर पडलीये...

खरच... बदलल्यायेत नाही गोष्टी...
तेव्हा रोजच्या असणाऱ्या वाटांवर, सध्या मी फारसा जात नाही...
तेव्हा रोज दिसणारे चेहेरे, सध्या कुणीच  दिसत नाही...
नमामि मामनो नुन्नम... ... ...
कागदा, सांग ना रे... आज का  आठवत नाही??

कसा कुणास ठावूक, पण माझ्याकडे पाहत कागद थोडासा हसला;
उलगडून आपल्या घड्या साऱ्या, हळूच मला म्हणाला...
"अरे, कागद जुना झाला म्हणून, आठवणी जुन्या होत नाहीत;
चेहेरे दिसले नाहीत म्हणून, माणसं भेटायची थांबत नाहीत...

ती भेटत राहतील तुला... कुणी भेटेल जेव्हा....
जेव्हा... एखादं अनोळखी घर, चार दिवसात आपलं होईल;
अन दोघांसाठीचा स्वयंपाक, चार-सहा जणात वाटला जाईल...
जेव्हा वेगवेगळी सगळी कामं, एकच माणूस पहात असेल;
अन अव्यक्तपणे कुणी त्याच्या, पाठीशी ठाम उभं असेल...

नाटकासाठी जेव्हा कुणी, भल्या पहाटे appraisal चा call घेईल;
कळत-नकळत प्रत्येकाला, केवढं काही शिकवून जाईल...
नाटकाबद्दल बोलताना जेव्हा, कुणाचेतरी हळवे डोळे भरून येतील;
अन 'रोल'मध्ये मात्र तेच, निर्धारपूर्वक कोरडे राहतील...

एखाद्या दुपारी, एखाद्या हॉटेलात, जेव्हा उत्साहानी तू बुफे खायला जाशील;
'हे काम करू का?' 'ते आणायला जाऊ का?', सारखं सारखं विचारशील...
नाईट-आऊट करून कुणी जेव्हा, सकाळी ऑफिसला जाईल;
आणि तरीही संध्याकाळी, वेळेत practice ला हजर राहील...

जेव्हा  कुणी आग्रहानी, तुला आपल्या घरी नेईल;
अन पहाटे साडेचारलाही, गरम गरम चहा देईल...
जेव्हा रात्र रात्र अनाहतपणे, कुणी तुझ्याशी गप्पा मारेल;
अन आपली रोजची कॉट सोडून, कुणी तुझ्यासाठी खाली झोपेल...

तुला दिलेले तुझेच पैसे, जेव्हा कुणी तुला परत मागेल;
'हे वाक्य छान वाटतंय की मघाचं?', कुणी जेहा मनापासून विचारेल;
आणि चांगली शिवी देण्यासाठी, पुन्हा पुन्हा practice करेल...

कुठल्याशा खोलीची इवलीशी किल्ली, कुणी हरवेल जेव्हा;
'इकडून घ्यायला येशील का?' 'तिकडे जरा सोडशील का?',
असं कुणी विचारेल जेव्हा...
नेमानी कुणी अख्खा दिवस, निर्जळी उपास करेल जेव्हा;
तरीही फक्त आवाजानी, मंडळ व्यापून टाकेल जेव्हा...

कुणी भेटेल फास्ट म्हटलेल्या डायलोग्ज मधून;
किंवा मारवाड्याशीदेखील शिताफीने bargaining करताना...
कुणी भेटेल सतत काहीतरी गुणगुणत;
किंवा 'sad violin' वरती mad होताना...
अंधाऱ्या रस्त्यावरचा एकटा दिवा, जेव्हा spotlight वाटेल, तेव्हा भेटेल कुणी...
कुणी त्याच light च्या घोड्यावर हळुहळू चढताना  भेटेल...
              कुणी भेटेल... शबनम घेऊन अमेरिकेला जाताना...
              कुणी 'pole dance' करत करत पोटगी मागताना...
              तर कुणी practiceसाठी दूरवरून, सायकलवरती येताना...
              कुणी भेटेल अचानक आलेल्या आजारपणातून...
              कुणी ऐनवेळी कामासाठी, मुंबईला जाताना...
              तर कुणी ऐनवेळी नाटकासाठी, घरून पळून येताना...
कुणी भेटेल dance बसवताना किंवा मनापासून फेविकोल फासताना...
कुणी सेटसाठी भरपूर, innovative ideas देताना...  
कुणी भेटेल अचानक वाजलेल्या 'switty' मधून...
तर कुणी, अंधाऱ्या विंगेत अचानक चमकलेल्या mobile मधून...
कुणी जेव्हा अपरात्री चहा-बिस्कीटं आणेल...
खून, दंगली, मारामाऱ्या, कुणी पुन्हा पुन्हा म्हणेल...
              जेव्हा कधी तू भेळेमध्ये, जास्तीचं 'पाणी' मागशील;
              किंवा leap year मध्ये जेव्हा, ३० फेब शोधत बसशील...
              कधीतरी क्रिकेट खेळताना, जेव्हा तू बोलिंग करशील;
              हारत आलेली mach जिंकायला जेव्हा, एकटाच जीव लावशील...
नाटकाचे फोटो परत परत बघताना, जेव्हा कुठून तरी तुला आवाज येईल;
'आठवणींना असं वाया जाऊ द्यायचं नसतं रे!' "

 पाहता पाहता कागदावरती, आठवणींचा कोलाज झाला;
पडलेल्या प्रत्येक घडीमधून, एकेक माणूस भेटून गेला...
कागद अजूनही माझ्याकडे बघून हसतोय;
डोळ्यांमधून निसटलेल्या थेंबांच्या नक्षीमुळे,
कसला सुंदर दिसतोय...!
कागदावरचे शब्द कदाचित, विरून जातील...
पण कायमचा लक्षात राहील,
              हा कागद...
              अपुऱ्या राहिलेल्या काही जिलब्या... अधुरा राहिलेला एक चहा...
              पूर्ण झालेली एक एकांकिका...
              अपूर्ण राहिलेला एक दीर्घांक...
              आणि या प्रवासात भेटलेला तो प्रत्येक माणूस... ... ...

कागदा, ऐक ना रे... एवढं एकच शेवटी सांगशील का रे...
चार क्षणांच्या घडलेल्या या भेटी,
पण कायमच्या कशा बरं जुळल्यायेत काही गाठी???

-- स्वानंद