Saturday, June 29, 2013

ओंजळ

एकदा भल्या सकाळी,
अस्फुट स्वप्नील स्वरासारखं,
अनाहूतपणे तू माझ्या समोर यावस…
आणि नुकत्याच खुडलेल्या सुकुमार
फुलांनी भरलेली तुझी ओंजळ,
हलकेच माझ्या हाती रिती करावीस…

तुझ्या या कृतीनी मी पुरता
गोंधळलेलो असताना,
तू अलगद आपला पदर सारखा करावास…  
मी अजून गोंधळाव…
तुला कळू नये म्हणून,
उगाच फुलांकडे पाहावं …

"माझी फुलं"
जितक्या सहज ही फुलं दिलीस,
तितक्याच सहज तू विचारावस…
त्या नाजूक, नितळ फुलांनाही
लाजवेल इतकं निखळ हसावस…
मी स्तंभित होऊन तुझ्याकडे
बघत असता, 
तू हळूच पुन्हा म्हणावंस…
"माझी फुलं !"

ती सुकुमार फुलांनी भरलेली ओंजळ,
मी तुझ्या नाजूक हाती पुन्हा सोपवावी…
अन त्यातली दोन इवली फुलं,
तुझ्या डोळ्यात जाऊन दडावित…

वाऱ्याच्या  हळुवार झुळूकेसारखी
क्षणात अदृश्य झालेली तू…
आणि आपला अदृश्य सुगंध क्षणभरच मागे ठेवणारी…
… "तुझी फुलं !"
   

कविता-बिविता

तुम्ही म्हणे 'प्रतिभावंत',  कविता-बिविता लिहिता
वाचणारी उगाच चार टाळकी, स्वतःला कवी म्हणवता

असाल तुम्ही रिकामटेकडे, म्हणून ओळींवर ओळी खरडता
यमाकांना सोबत घेऊन, प्रतिमांना भरडता

चार ओळी लिहितात हो हे, यांना कुठं काय स्फुरतं ?
संदर्भासहित स्पष्टीकरण, कवितेत दुसरं काय उरतं ?

कविता-बिविता कसल्या करता,
वेळ असेल एवढा तर निबंध लिहा, चार पानी
चार ओळीत कसली करता,
कल्पनांची मनमानी ?

तुम्हाला नसतील हो,
पण आम्हाला व्याप असतात;
तुम्ही आपले फुकाचे, शब्दांचे खेळ करा….
एक फुकटचा सल्ला देतो,
आमच्यासाठी शाळेपासून,
कवितेपेक्षा धडा बरा !

Wednesday, June 26, 2013

कातरवेळ

फिकट झालेत पश्चिमेला, क्षितिजावरचे रंग
क्षितीज झालंय आभाळाच्या, निळाईमध्ये दंग

उरली आहे क्षितिजावरती, अंधुक एक पिवळी रेघ
क्षितिजाच्या पल्याड दूर, बरसणारा कृष्णमेघ

अंधाराच्या शून्यात क्षितीज, कुणाला एवढं शोधतंय ?
आर्त गहिऱ्या निळाईत, वेडं स्वतःच हरवतंय !

क्षितिजाच्या मनात उठलंय, चांदण्यांचं काहूर
अंतरात मंतरलेली… अनाहत हुरहूर

वाऱ्यासारखं सैरावैरा, मनासारखं अधीर झालंय
क्षितीज त्याच्या क्षितीजासाठी, केवढं  सैरभैर झालंय

शांतपणे रात्र दुरून, पाहतीये सारा खेळ
पांघरतीये क्षितिजावरती, गर्द निळी कातरवेळ…

Wednesday, June 12, 2013

मौन

शब्दांत सखे या, मौन तुला गवसावे
नभ भरलेले परी, निरभ्र तुज भासावे

वाळूवर उठली, असंख्य पाऊलचिन्हे
लाटांनी त्यांना, अंतरात ओढावे

पाण्यात तळ्याच्या, कित्येक पहुडल्या प्रतिमा
वेड्या तीरीपेने, सारे सोनेरी व्हावे

मी पिसासारखा, दिशाहीन उडताना
तू अलगद मजला, मुठीत ओढून  घ्यावे